ज्येष्ठांसाठी मोफत रुग्णवाहिकेचा संकल्प
---------------------------------
अत्यल्प खर्चात उपचाराची डॉ. सुराणा यांची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. ३ : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा तसेच अत्यल्प खर्चात उपचार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला असल्याचे डॉ. कांतिलाल सुराणा यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे ज्येष्ठांच्या आरोग्यविषयक सेवांबाबत आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष निंबा निकम अध्यक्षस्थानी होते.
मुले बाहेरगावी स्थायिक झाल्याने एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ पालकांची रात्री-अपरात्री अचानक प्रकृती बिघडल्यास मदतीसाठी कोणाला संपर्क करायचा, या समस्येवर उद्योजक संजय फतनानी यांनी उपाययोजनेची गरज मांडली. त्यावर डॉ. सुराणा म्हणाले, रुग्ण ज्या डॉक्टरांकडून उपचार घेत आहे, त्या डॉक्टरांना रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही रुग्णालय प्रशासन घेणार आहे. ज्येष्ठांना आधार देणे म्हणजे संस्कारांना आधार देणे होय. डॉ. सुराणा यांचा सत्कार संस्थेचे सचिव धर्मराज देवरे यांनी, तर संजय फतनानी यांचा सत्कार प्रकाश वडगे यांनी केला. निंबा निकम यांनी प्रास्ताविक केले. गोपीनाथ सूर्यवंशी यांनी आभार मानले.
सहसचिव नाना इंगळे, खजिनदार डॉ. प्रभाकर जाधव, जगदीश निकम, डी. आर. हिरे, प्रभाकर वारुळे, शिवाजी पवार, गोविंद सोनवणे, शांतिलाल बाफना, रामचंद्र हिरे, आप्पा मुसळे उपस्थित होते.
मालेगाव शहर : जेष्ठ नागरिक संस्थेच्या व्याख्यानात बोलताना डॉ कांतिलाल सुराणा, अध्यक्ष निंबा निकम.