श्री मंगळग्रह मंदिरात भव्य महारुद्र पूजा
आज पूर्णाहुती; श्रावण समाप्ती, संकल्पपूर्तीनिमित्त धार्मिक सोहळा
सकाळ वृत्तसेवा
अमळनेर, ता. १० : येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रावण मासाची समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त बुधवारपासून (ता. ९) तीन दिवस भव्य महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी आशा महाले यांच्याहस्ते या विशेष धार्मिक सोहळ्यातील परम पवित्र अनुष्ठान झाले.
दोन सत्रात झालेल्या पूजेचे पौरोहित्य प्रधान आचार्य केशव पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. श्री मंगळग्रह मंदिरातील मुख्य स्वयंभू अतिजागृत मूर्तीवर ११ लघुरुद्र (१ हजार ३३१ रुद्र आवर्तने) करून मंगळदेवांचा महाभिषेक दोन दिवस करण्यात येत आहे. तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ११) श्री मंगळदेव व मंदिरातील संपूर्ण परिवार देवतांचे हवन करून बलिदान व पूर्णाहुती करून हे कार्य सिद्धीस नेले जाणार आहे.
महारुद्र पूजेची फलश्रुती
धार्मिक श्रद्धेनुसार महारुद्र पूजेच्या माध्यमातून मनःशांती, आरोग्य, सुख-समृद्धी, कुटुंबातील सौख्य आणि जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी श्री मंगळदेवांची कृपा प्राप्त होते, अशी भाविकांमध्ये भावना आहे. संकटसमयी मानसिक बळ मिळावे, नकारात्मक विचार दूर व्हावेत आणि जीवनात सकारात्मकता व सात्त्विक विचारांची वृद्धी व्हावी, या हेतूने अनेक भाविक रुद्राभिषेक व महारुद्र पूजेचे अनुष्ठान करतात. श्री मंगळदेवांच्या कृपाशीर्वादाची फलश्रुती केवळ भौतिक इच्छांच्या पूर्ततेपुरती मर्यादित नसून आत्मशुद्धी, मनाची एकाग्रता, अहंकाराचा क्षय आणि ईश्वराशी असलेले नाते अधिक दृढ होणे हा तिचा व्यापक आध्यात्मिक अर्थ मानला जातो. श्री मंगळदेवभक्तांनी या अध्यात्मिक पर्वात सहभागी होऊन भगवान श्री मंगळदेवांचे दर्शन व पूजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.
-----------------------