AMR26B07334
अमळनेर : श्री मंगळग्रह मंदिरात पूर्णाहुतीपूर्वी महाआरती करताना आमदार अनिल पाटील व जयश्री पाटील, पूजेचे विशेष यजमान डॉ. डिगंबर महाले व आशा महाले. शेजारी मान्यवर.
भाविकांनी घेतली महारुद्र पूजेची अनुभूती
अमळनेर येथे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे तीन दिवसीय सोहळ्याची सांगता
सकाळ वृत्तसेवा
अमळनेर, ता. १७ : येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवांच्या परम पवित्र तीन दिवसीय भव्य महारुद्र पूजेची सांगता भक्ती, चैतन्य आणि मंगलमय वातावरणात पूर्णाहुतीने झाली. यावेळी आमदार अनिल पाटील व त्यांच्या धर्मपत्नी जयश्री पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व सहायक निरीक्षक शरद काकळीज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती केशव पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी आशा महाले या विशेष धार्मिक सोहळ्याचे यजमान होते. त्यांच्याहस्ते या तीन दिवसीय परम पवित्र भव्य महारुद्र अभिषेक पूजेचे अनुष्ठान कार्य झाले. सांगता वेळी सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्व स्थापित देवतांची पूजा झाली. भगवान महादेव, श्री मंगळग्रह देव, भूमिमाता, पंचमुखी हनुमान यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अरणीमंथन करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला. नवग्रह रुद्र स्थापन करून त्यांचे हवन झाले. प्रधान देवता श्री मंगळग्रह देव व भगवान महादेवांच्या प्रित्यर्थ रुद्राच्या १२१ आवर्तनांनी हवन (अंदाजे दोन हजार आहुत्या) यज्ञात टाकण्यात आल्या. भगवान शंकरांच्या जल्लोषपूर्ण तांडवस्तोत्राने पूर्णाहुतीसाठीची वातावरणनिर्मिती झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे यांच्यासह मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, उमाकांत हिरे, बाळा पचार, पुषंद ढाके आदींचे सहकार्य लाभले.
आमदार अनिल पाटलांकडून टाळ वादन
या सोहळ्यात दुपारी आमदार अनिल पाटील अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडलस्थानी काही वेळ बसले. यावेळी वाद्यवृंदाच्या साथीत म्हटल्या गेलेल्या श्री मंगळग्रह देव आणि भगवान शंकर यांच्या स्तुतीपर भजनांवर टाळ वादन करीत मंत्रमुग्ध होऊन त्यांनीही साथसंगत केली. याप्रसंगी उपस्थित असंख्य भाविकांनीही या स्तुतीपर भजनांचा आत्मानंद घेतला.
----------------------पूर्ण