बिल चुकल्याने २१ तारखेनंतर वेतन
-----------------------------
एका शाळेमुळे १२ हजार शिक्षकांना मनस्ताप
सकाळ वृतसेवा
जुनी शेमळी ता. १४ : जिल्हयातील सुमारे १२ हजार प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी पंधरा दिवसापूर्वी शासनाकडून निधी प्राप्त झाला, मात्र एका तालुक्यातील एका शाळेचे बिल चुकल्याने बारा हजार शिक्षकांना २१ तारखेपर्यंत वेतनासाठी वाट पहावी लागणार आहे
शासनाकडून निधी प्राप्त झाला. प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा भास निर्माण होऊन शिक्षकांमध्ये संताप होता. मात्र चांदवड तालुक्यातील एका शाळेचे बिल चुकल्याने केलेले बिल १७ तारखेनंतर डिलिट टॅब ॲक्टीव्ह होईल. बिल १८ तारखेला डिटील झाल्यावर १९ तारखेला तालुका स्तरावरून तयार करून बिल फॉरवर्ड होतील. त्यानंतर २१ पर्यंत वेतन पगार होईल. असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात सुमारे १२ हजार शिक्षक असुन फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्राप्तीकराची मोठी कपात झाल्याने अनेकांना दंड सोसावा लागल्याने जेमतेम वेतनावर शिक्षकांची कुंटुबाची गुजराण सुरू आहे. लग्नसराई सुरू असल्याने खर्च करण्यासाठी पैसा नाही. अशा स्थितीत दर महिन्याला ज्या तालुक्याचे बिल अपूर्ण राहिले तेवढ्याचे तालुक्याचे अनुदान अदा करण्यात येऊ नये. इतर तालुक्यातील शिक्षकांची गैरसोय टाळावी. अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
कोट
वेतनासाठी पंधरा दिवसांपूर्वी अनुदान प्राप्त झाले. मात्र एका तालुक्यातील एका शाळेचे बिल चुकल्याने शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे. यापुढे बिल चुकलेल्या तालुका वगळून अन्य तालुक्याचे पगार अदा करावेत.
-पृथ्वीबाबा शिरसाठ विभागीय अध्यक्ष शिक्षक संघ