फोटो ओळी- 04075
किरातवाडी ः येथील रस्त्यालगत फ्लॉवरच्या पिकात मेंढ्या चारताना मेंढपाळ.
फ्लॉवरला भाव नसल्याने शेतात मेंढ्या
जुनी शेमळी, ता. ११ ः बाजारपेठेत फ्लॉवर पिकाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फ्लॉवरकडे दुर्लक्ष करत चक्क शेतात मेंढ्या चरण्यास सोडल्या आहेत.
फ्लॉवर लागवडीसाठी बियाणे, रोपे, खते, औषधे, मजुरी, पाणी व वाहतूक यावर मोठा खर्च होतो. मात्र बाजारात आवक वाढल्याने दर घसरले असून, शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे काढणी, वाहतूक आणि बाजारपेठेत विक्री करण्याचा खर्चही परवडत नाही. भावातील घसरणीमुळे काही शेतकऱ्यांनी तयार झालेले फ्लॉवर पीक बाजारात नेण्याऐवजी शेतातच सोडून दिले आहे. त्यामुळे जनावरांसाठी ते चारा म्हणून वापरण्याची वेळ आली आहे. मेहनतीने पिकवलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
.......
कोट
बियाणे, खते, औषधे व मजुरीच्या वाढत्या खर्चाच्या तुलनेत फ्लॉवरला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सरकारने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाबाबत दिलासा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
भूषण ढेपले, शेतकरी
................