आठ महिन्यांची बालिका बेपत्ता
चौकशी झालेल्या श्रावण मोरे यांचा हद्दीत मृत्यू; कारण अस्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक/नांदगाव, ता. १९ : आई-वडिलांच्या शेजारी झोपलेली आठ महिन्यांची बालिका मध्यरात्री बेपत्ता झाल्यानंतर सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान शनिवारी (ता. १९) श्रावण दामू मोरे (वय ५५) यांचा मृतदेह वन विभागाच्या हद्दीत आढळून आला. बालिका बेपत्ता प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोरे यांची चौकशी केली होती. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आठ महिन्यांची बालिका बेपत्ता झाल्याने परिसरात चिंता निर्माण झाली आहे. त्यातच तपासादरम्यान मोरे यांचा मृतदेह आढळल्याने या घटनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, बालिका बेपत्ता होणे आणि मोरे यांचा मृत्यू यांचा थेट संबंध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, या दृष्टीने तपास सुरू आहे.
गुरुवारी (ता. १७) रात्री साडेअकरा ते मध्यरात्रीच्या सुमारास आईला जाग आल्यानंतर मुलगी शेजारी नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी घरासह परिसरात शोध घेतला; मात्र रात्री उशिरापर्यंत बालिकेचा ठावठिकाणा लागला नाही.
शुक्रवारी कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ आणि पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, मनमाडचे पोलिस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे, पोलिस निरीक्षक विजय कारे, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली.
तपासादरम्यान परिसरातील काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली. त्यात श्रावण मोरे यांचाही समावेश होता. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले होते. शनिवारी वन विभागाच्या हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
मोरे यांच्या मृतदेहाचे नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. विच्छेदनानंतर सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
मोरे यांच्या मृत्यूची पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बालिका बेपत्ता प्रकरण आणि मोरे यांच्या मृत्यूचा थेट संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितलेले नाही. दोन्ही घटनांचा स्वतंत्रपणे तपास सुरू असून, संभाव्य संबंधाचाही तपास केला जात आहे.
बालिकेचा अद्याप शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांची चिंता कायम आहे. पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच आधार द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाणगाव : श्रावण मोरे यांच्या विच्छेदनावेळी रुग्णालय परिसरात ठाण मांडून असलेले नातेवाईक.