शाळेच्या आवारातील
अंगणवाड्यांची नासधूस
सकाळ वृत्तसेवा
ब्राह्मणगाव, ता. ८ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक इंग्रजी मॉडेल स्कूलच्या आवारातील अंगणवाड्यांमध्ये अज्ञात समाजकंटकांनी नासधूस केल्याची घटना समोर आली आहे. तीन अंगणवाड्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडून तसेच दरवाजाचे कुलूप तोडून साहित्याची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
समाजकंटकांनी अंगणवाडीतील साहित्याची नासधूस करण्याबरोबरच पाण्याची टाकीही फोडली. तसेच अंगणवाडीतच पार्टी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे शाळा व अंगणवाडी प्रशासनासह ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक शाळेच्या आवारात चार अंगणवाड्या असून परिसराला संरक्षण भिंत आहे. तरीही अज्ञात व्यक्ती संरक्षण भिंत ओलांडून रात्रीच्या वेळी शाळेच्या आवारात प्रवेश करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वीही परिसरात चोरी व नासधुशीच्या घटना घडल्या असून, वारंवार होणाऱ्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वारंवार होणाऱ्या चोरी व नासधुशीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.