शालेय वाहनांच्या कागदपत्रांची
तपासणी महिनाअखेर पूर्ण करा
-----
पुर्ततेचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १४ : जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापूर्वी स्कूलबस व व्हॅनची कागदपत्रे तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहनाची योग्यता प्रमाणपत्र, परवाना, पीयूसी, विमा आदी कागदपत्रे वैध असल्याची खात्री करूनच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस परवानगी द्यावी. शाळा व्यवस्थापनस्तरावर प्रत्यक्ष तपासणी करून कागदपत्रे अपूर्ण असल्यास हे कागदपत्रे वैध करून घेण्याबाबत संबंधित वाहनचालक, मालक यांना शाळा व्यवस्थापनस्तरावरून सुचना देण्यात याव्यात. महिनाअखेर हे काम पूर्ण करावे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेशात दिले आहेत.
वाहनांची सर्व कागदपत्रे वैध असल्यावरच त्यांना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची मुभा द्यावी, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे व विना अपघात व्हावी, यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले आहेत.
तपासणीदरम्यान कागदपत्रे अपूर्ण आढळल्यास संबंधित वाहन जप्त करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन व वाहनधारकांवर राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीस संबंधित शाळा व्यवस्थापन, वाहतूकदार यांची सर्वस्वी जबाबदारी राहील, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्व परवानाधारक स्कूलबस, व्हॅनधारक व चालकांनी नियमानुसार त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनकर व इतर अनुषंगिक कागदपत्रांची ३१ मे २०२६पूर्वी पूर्तता करुन घ्यावी. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विशेष बाब म्हणून या कार्यालयातर्फे अतिरिक्त (विशेष कोटा) सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी दिली.