जिल्हा टुडे पान चारसाठी ॲंकर
---------------------------
BSW26B11882
भुसावळ : रेल्वेत महिलेची सुरक्षित प्रसूतीसाठी पुढाकार घेणारे मुख्य तिकीट निरीक्षक आर. एस. तेली नुकत्याच जन्मलेल्या बाळासह.
------------------
तिकीट निरीक्षकाच्या पुढाकाराने रेल्वेत महिलेची सुरक्षित प्रसूती
अनेकांकडून कौतुक; इगतपुरी स्थानकावरून बाळासह आई दवाखान्याकडे रवाना
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १५ : रेल्वेचे तिकीट निरीक्षक म्हटंला म्हणजे तो खडूसच, असा समज आहे, परंतु, या प्रतिमेला छेद देत भुसावळ रेल्वे विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक यांनी मानवी दृष्टिकोनातून पुढाकार घेतल्याने एका महिलेची रेल्वेतच सुरक्षित प्रसूती झाली. त्यानंतर इगतपुरी रेल्वेस्थानकावरून बाळासह आई दवाखान्याकडे रवाना झाले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मध्य रेल्वे भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक आर. एस. तेली यांनी कर्तव्य बजावताना मानवी संवेदनशीलता व तत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण सादर करीत गर्भवती महिला प्रवाशाला वेळेत मदत करून रेल्वेत सुरक्षित प्रसूती घडवून आणली. लोकमान्य टिळक टर्मिनस ते भुसावळदरम्यान (गाडी क्रमांक २२५३८) कुशीनगर एक्सप्रेसमध्ये कार्यरत असताना कल्याण स्थानकानंतर (ए/१) या डब्याजवळील जनरल डब्यातून एका प्रवाशाने माहिती दिली की, एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत असून, जनरल डब्यात मोठी गर्दी असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य तिकीट निरीक्षक आर. एस. तेली यांनी तत्काळ मानवी दृष्टीकोनातून पुढाकार घेत कसारा स्थानक आल्यानंतर काही प्रवाशांच्या मदतीने संबंधित महिलेला सुरक्षितपणे (ए/१) या वातानुकुलित डब्याच्या कॅरी डोअर परिसरात आणले. योगायोगाने त्याच जनरल डब्यात प्रवास करणाऱ्या परिचारिका/डॉक्टर पुजा खरगे यांच्या सहाय्याने रेल्वेतच महिलेची सुरक्षित व नैसर्गिक प्रसूती करण्यात आली अन् महिलेने एका निरोगी व सुंदर कन्येला जन्म दिला.
---
तात्काळ आवश्यक व्यवस्था
घटनेची माहिती तात्काळ मुंबई येथील मुख्य वाणिज्य नियंत्रकांना देण्यात आली. त्यानंतर इगतपुरी स्थानकावर रुग्णवाहिका, स्ट्रेचर, डॉक्टर व उपस्थानक अधीक्षक यांची आवश्यक व्यवस्था करण्यात आली. इगतपुरी स्थानकावर पोहोचल्यानंतर महिला व नवजात बालिकेला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रतिमा उंचावण्यास मदत
मुख्य तिकीट निरीक्षक तेली यांची तत्परता, कर्तव्यनिष्ठा व मानवी सेवाभावाचे प्रवासी व रेल्वे प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या ‘प्रवासी सेवा आणि सुरक्षा’प्रति असलेल्या बांधिलकीचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तिकीट तपासणीस हा रेल्वेचा ब्रॅण्ड ॲम्बेसॅडर असतो, असे मानले जाते. त्याच्या वागण्यावर रेल्वेची प्रतिमा ठरते. तेली यांच्या कृतीमुळे रेल्वेची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली आहे.