भुसावळ राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?
---
माजी आमदार संतोष चौधरींसह बहुतांश नगरसेवक मुंबईत दाखल
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ३१ : येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. ३१) माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह पक्षाचे बहुतेक नगरसेवक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, रात्री उशीरापर्यंत याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नव्हता. माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यासंदर्भात पुढाकार घेत असल्याचे समजते.
गेल्या चार- पाच महिन्यांपासून भुसावळचे राजकारण थंड झाल्याचे वाटत होते. मध्यंतरी माजी प्रभारी नगराध्यक्ष व प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी अनिल चौधरी यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करून प्रचारही सुरू केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. गेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे निवडून आल्या होत्या. मात्र, बहुमत भाजप महायुतीकडे होते. दरम्यान, जात पडताळणी समितीने भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांना पदावरून दूर व्हावे लागले. सध्या भाजपच्या उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे प्रभारी नगराध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. भाजपच्या सत्तेला शह देण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे १२ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बहुतेक नगरसेवक मुंबईत दाखल झाले आहेत. याबाबत गटनेते सचिन चौधरी यांनी सांगितले, की आम्ही मुंबईत आलो, हे खरे असले तरी आम्ही कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मला याबाबत विचारणा होत आहे. आम्ही शरद पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमच्या समस्या मांडणार आहोत. श्री. चौधरी यांचे वडील माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की मी मुंबईत आहे. माझे बंधू अनिल चौधरींसह नगरसेवक एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. मी मात्र जाणार नाही. ते नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील किंवा नाही, हे लवकरच समजेल. मी मात्र श्री. पवार यांना सोडणार नाही.