पान-१
CHD26B04784
भेंडाळी ः सकल मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी येथे रास्तारोकोनंतर पोलिसांना निवेदन देताना नागरिक.
---------------
जरांगेंच्या समर्थनार्थ भेंडाळीत रास्तारोको
बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ः मागण्यांबाबत प्रशासनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चांदोरी, ता.११ ः मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील करत असलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी शुक्रवारी (ता.११) सकाळी भेंडाळी येथे सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.
--------------------
श्री. जरांगे पाटील गेल्या तेरा दिवसांपासून उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत असतानाही शासनाने अद्याप आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील मराठा समाज पूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. समाजातील काही तथाकथित नेते वेगळी भूमिका मांडत असले तरी सामान्य मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले.
भेंडाळी येथे आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन निफाडचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील तसेच सायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर आव्हाड यांना देण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा त्यांच्या सूचनेनुसार गावागावांत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. या आंदोलनात परिसरातील मराठा बांधव सहभागी झाले होते.
-----------------
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण हे केवळ एका व्यक्तीचे आंदोलन नसून संपूर्ण मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठीचा लढा आहे. त्यांच्या मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन त्या मान्य कराव्यात. अन्यथा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार गावागावांत तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- शरद खालकर, आंदोलक, भेंडाळी
---------------------