फोटो : B16723
नाशिक रोड : विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करताना सफाई कर्मचारी.
--
नाशिक रोडला सफाई कर्मचाऱ्यांचा ठिय्या
दोन दिवसांत निर्णय घेण्याच्या आश्वासनांनंतर आंदोलन मागे
नाशिक रोड, ता. १४ : स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कर्मचारी युनियनतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक रोड विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी विभागीय अधिकारी व प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांना निवेदन देण्यात आले. संबंधित मागण्यांवर दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन सभापतींनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयांतर्गत सुमारे ४०० ते ५०० सफाई कर्मचारी कार्यरत असून आरोग्य आस्थापनेसाठी केवळ एकच कनिष्ठ लिपिक उपलब्ध असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागातील दुसरे कनिष्ठ लिपिक कामाच्या सोयीप्रमाणे आरोग्य विभागात येत असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. या मुळे सफाई कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन, रजा मंजुरी, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याच्या फाईली, पेन्शन प्रस्ताव, जादा कामाचे वेतन, परिविक्षाधीन कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रक्रिया, वेतनश्रेणी फरकाची बिले तसेच वैद्यकीय रजेची देयके आदी कामे रखडल्याची तक्रार करण्यात आली. आरोग्य आस्थापनेसाठी कायमस्वरूपी कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक व सहायक अधीक्षक नियुक्त करावेत, तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण ढकोलीया, सरचिटणीस सागर खरे, कार्याध्यक्ष जयभय्या यादव, विजय जाधव, राहुल तुसाबड, सागर बारगळ, प्रवीण बिन्हाडे, करण निकम, अनिल गांगुर्डे, लोकेश गांगुर्डे, रणजीत हंसराज, विकास शेळके, नारायण दाभाडे, आनंद राठोड, ज्योती वाघमारे, गौरी पवार आदी कामगार उपस्थित होते.