एन्कर
फोटो : B16740
नाशिक रोड : राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या महाअधिवेशनाप्रसंगी महावितरण कंपनीचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार, केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, प्रशिक्षण व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर आदी
--
तांत्रिक कर्मचारीच महावितरणचे खरे आधारस्तंभ
राजेंद्र पवार : वीज तांत्रिक कामगार संघटनेचे २८ वे महाअधिवेशन
नाशिक रोड, ता. १५ : वादळ, पाऊस आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तांत्रिक कर्मचारी अखंड सेवा देतात. ग्राहकांना केवळ बटन दाबताच वीज मिळते, पण त्यामागे लाखो कर्मचाऱ्यांचे अहोरात्र कष्ट असतात. हे कर्मचारीच महावितरणचे खरे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन महावितरणचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार यांनी केले.
राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे २८ वे महाअधिवेशन नाशिक रोड येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे होते. व्यासपीठावर मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर, नगरसेवक निमसे, सरचिटणीस सय्यद जगिरोद्दीन, नागोराव मगर, नाना चट्टे, कैलास गौरकर, अजीज पठाण, मजहर पठाण, भानुदास शेवाळे, विश्वंभर लोखंडे, अधिकारी रवींद्र खाडे, प्रमोद राजेभोसले, जनसंपर्क अधिकारी विकास आढे आदी उपस्थित होते.
राजेंद्र पवार यांनी सांगितले की, सुरक्षा साधनांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून मेअखेर सर्व जिल्ह्यांत साहित्य पोहोचेल. यावर्षी २१ लाख विद्यार्थ्यांपर्यंत वीज सुरक्षा आणि बचतीचा संदेश पोचवण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, कामगार कल्याण निधीतून शिष्यवृत्ती, वैद्यकीय मदत आणि मुलींच्या शिक्षणासाठीच्या अर्थसाह्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. अधिवेशनात १५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना थेट ऑपरेटर पदावर संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. खासगीकरणाच्या संभ्रमावर बोलताना पवार स्पष्ट केले की, महावितरणचे खासगीकरण होणार नाही; कंपनी कर्मचाऱ्यांचीच राहील. भविष्यात कर्मचाऱ्यांना कंपनीत मालकी हक्क देण्याबाबतही विचार सुरू आहे.
--चौकट
सौर ऊर्जा आणि भविष्यातील आव्हाने
महावितरण सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत असून कर्मचाऱ्यांना सोलर प्रकल्पांसाठी व्याजमुक्त कर्ज दिले जात आहे. आगामी कुंभमेळ्याचे आव्हान आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी अद्ययावत राहण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
या वेळी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची ऑनलाइन भाषणे झाली. अधिवेशनात विविध महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. प्रिया जैन व संदीप पांचगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. चंद्रकांत अहिरे यांनी आभार मानले. आयोजनासाठी किसन बगड, गिरीश जगताप, विनोद अहिरे, विष्णू शिरसाठ, विनायक मगर यांनी परिश्रम घेतले.