अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याची बतावणी
---
सहा तोतयांना अटक; पानटपरी चालकाकडे १० लाखांच्या खंडणीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. २२ : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून एका पानटपरी चालकाकडून १० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला उपनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन पुरुष व तीन महिलांचा समावेश असून, ते ठाणे, घाटकोपर व डोंबिवली परिसरातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेल रोड परिसरातील रहिवासी दीपक पोपटराव बोराडे (वय ५५) यांची शिवाजीनगर बसस्थानकाजवळ ‘शिवनेरी’ नावाची पानटपरी आहे. सोमवारी (ता. २२) सकाळी साडेअकराच्या सुमारास एमएच- ४६- सीयू- ८७०६ क्रमांकाच्या इर्टिगा कारमधून तीन पुरुष व तीन महिला टपरीवर आले. त्यांनी कोणतीही परवानगी न घेता टपरीत प्रवेश करून स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले.
‘तुम्ही गुटखा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली आहे,’ असे सांगत त्यांनी टपरीची झडती घेण्यास सुरुवात केली. बोराडे यांनी ओळखपत्राची मागणी केल्यावर संशयितांनी दुरूनच एक कथित ओळखपत्र दाखविले. याचवेळी टोळीतील एका व्यक्तीने स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे बोराडे घाबरले असताना संशयितांनी कारवाई टाळायची असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. बोराडे यांनी असमर्थता दर्शविल्यावर फोनवर बोलण्याचे नाटक करीत अखेर पाच लाख रुपयांवर तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, संशय आल्याने बोराडे यांनी प्रसंगावधान राखत स्थानिक पत्रकार संदीप नवसे यांना फोन करून घटनास्थळी बोलावले. नवसे यांनी संशयितांची चौकशी सुरू करताच त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी तत्काळ उपनगर पोलिसांशी संपर्क साधला.
माहिती मिळताच उपनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुनील गजानन मालुसरे (घाटकोपर), शरद रामचंद्र गायकर (दिवा, ठाणे), शरद भगवान पाटील (डोंबिवली), गौरी महेश बर्डे (ठाणे), सरिता संजय मोरे (पूर्व ठाणे) आणि सरला शरद गायकर (दिवा, ठाणे) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संबंधितांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. सुरुवातीला अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तींनी नंतर आपण ‘सामाजिक कार्यकर्ते’ असल्याचे सांगत घूमजाव करण्याचा प्रयत्न केला. दीपक बोराडे यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात सहाही संशयितांविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.