मेनजवळ स्वतंत्र लावणे
16963
नाशिक रोड : वीज भवनसमोर स्मार्ट, प्रीपेड मीटरविरोधात आंदोलन माकपचे ॲड. तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, दगडू व्हडगर, एकनाथ इंगळे, मोहन जाधव आदी.
स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात माकप
आक्रमक; वीजभवनसमोर आंदोलन
नाशिक रोड, ता. २३ : महावितरणकडून विनापरवानगी आणि बेकायदेशीरपणे स्मार्ट तसेच प्रीपेड मीटर बसविण्याचा आरोप करत भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक रोड येथील वीज भवनसमोर मंगळवारी (ता.२३) निदर्शने करण्यात आली. मुख्य अभियंत्यांना यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महावितरणकडून नाशिक शहरातील अनेक भागांत ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट व प्रीपेड मीटर बसविण्यात आले असून ही प्रक्रिया अद्याप सुरू आहे. स्मार्ट मीटर सक्तीबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नसताना आणि विद्यमान मीटर सुस्थितीत असतानाही नवीन मीटर बसविले जात असल्याचा आरोप करण्यात आला. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात अवाजवी वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत असून, प्रीपेड प्रणालीमुळे ग्राहकांवर अन्याय होण्याची शक्यता वाढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी विनापरवानगी मीटर बसविण्यात आले आहेत ते काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी करण्यात आली.
ॲड. तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, दगडू व्हडगर, एकनाथ इंगळे, मोहन जाधव, सतीश खैरनार, दीपक कोर, हिरामण तलोरे, राहुल गायकवाड आदींसह सदस्य आंदोलनात सहभागी होते.