पान चार
------------------
16964
नाशिक : नवजात बालिकेची तपासणी करताना डाॅक्टर
पोलिसांनी वाचवला नवजात बालिकेचा जीव
आरपीएफ, एमएसएफ जवानांनी जपली मानवतेची नाळ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. २३ : भुसावळ रेल्वे विभागांतर्गत नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) यांच्या जवानांनी प्रसंगावधान, तत्परता आणि मानवतावादी दृष्टिकोनातून एका नवजात बालिकेचा जीव वाचवला.
२२ जून २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर ओढा रेल्वे स्थानकावर नियमित गस्तीदरम्यान आरपीएफचे कॉन्स्टेबल योगेश गावड आणि एमएसएफचे जवान प्रशांत जाधव हे मालगाडीची तपासणी करत होते. पहाटे सुमारे पाऊणेतीनला मालगाडीच्या १३ व्या डब्यातून नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही जवानांनी तात्काळ संबंधित डब्याची तपासणी केली. त्यावेळी एका कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सोडून दिलेली नवजात बालिका आढळून आली. बालिकेची स्थिती लक्षात घेऊन जवानांनी विलंब न करता शासकीय रेल्वे पोलिस आणि चाइल्डलाइन प्रतिनिधींना माहिती दिली. बालिकेची सुरक्षितता सुनिश्चित करत तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आणि पुढील उपचारांसाठी तिला जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे दाखल करण्यात आले. सध्या बालिकेची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आरपीएफ आणि एमएसएफ जवानांनी दाखविलेल्या सतर्कता, धाडस आणि संवेदनशीलतेमुळे एका निष्पाप जीवाचे प्राण वाचू शकले.