पान-३ मुख्य अंक
CHE26B16974
नाशिक रोड ः संचमान्यतेप्रश्नी धरणे आंदोलन करताना नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सदस्य असलेले शिक्षक.
-----------
३६-४
नवीन संचमान्यतेचा मसुदा तत्काळ रद्द करा
-----------
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन ः गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम शक्य
-----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. २६ ः कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसाठी लागू असलेले प्रचलित निकष कायम ठेवावेत आणि शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेला नवीन संचमान्यता मसुदा मागे घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे गुरुवारी (ता. २६) विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात आले.
महासंघातर्फे शिक्षण उपसंचालकांना सविस्तर निवेदनही देण्यात आले. त्यानुसार, गेल्या अनेक दशकांपासून विद्यार्थिसंख्या, शाखा, तुकडी, विषय, प्रात्यक्षिके आणि अध्यापन तासिकांच्या आधारे शिक्षकांची संख्या व कार्यभार निश्चित केला जातो. मात्र शिक्षण संचालनालयाने २७ मे २०२६ ला प्रसिद्ध केलेल्या संचमान्यतेच्या मसुद्यात अनेक मूलभूत बदल सुचविले आहेत. विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिकांसाठीची बेंच क्षमता २० वरून ३० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविणे, अनेक विभागांमध्ये ४५ मिनिटांच्या तासिकांचे ४० मिनिटांमध्ये रूपांतर करणे यांसारख्या बदलांचा समावेश करण्यात आला आहे.
या बदलांमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींवर परिणाम होणार आहे. सुमारे आठ ते दहा हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता असल्याचे महासंघाने म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होण्याबरोबरच शिक्षकांच्या अस्तित्वावरही गदा येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महासंघाने गेल्या आठ ते दहा महिन्यांत मंत्रालय, शिक्षण आयुक्त कार्यालय आणि शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. ११ मे २०२६ ला नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी शिक्षकांवर अन्याय होणार नाही, तसेच अंतिम मसुदा तयार करताना चर्चा केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे महासंघाने सांगितले. शिक्षक संघटनांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मसुदा प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप महासंघाने केला आहे. त्यामुळे हा मसुदा रद्द करून पूर्वीचे निकष कायम ठेवावेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रा. सतीश पाटील, प्रा. नंदन वळीकर, डॉ. संजय शिंदे, प्रा. सुनील सोनार, प्रा. अनिल महाजन, प्रा. गणेश सोनवणे, प्रा. घनश्याम सूर्यवंशी, प्रा. भरत चव्हाण आदी उपस्थित होते.
-----------------