फोटो : B16983
--
जुन्या वादातून देवळालीगावात तरुणाचा खून
लपून बसलेला संशयित मित्र पोलिसांच्या ताब्यात
नाशिक रोड, ता. २६ : देवळाली गावात जुन्या वादातून एका ३७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गुरुवारी (ता. २५) मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, उपनगर पोलिसांनी संशयित मित्राला ताब्यात घेतले आहे.
विशाल सीताराम माळवे (रा. सुवर्ण सोसायटी, देवळाली गाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर संशयित अमोल गायकवाड (वय ३९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल माळवे आणि अमोल गायकवाड हे दोघे गुरुवारी रात्री एकत्र बसून मद्यपान करत होते. त्या वेळी जुन्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला. संतापाच्या भरात अमोल गायकवाड याने धारदार शस्त्राने विशालवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला विशाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घरात लपून बसलेल्या संशयित अमोल गायकवाड याला ताब्यात घेतले. तो घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत निरीक्षक डंबाळे, उपनिरीक्षक विशाल सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, अनिल शिंदे, योगेश झाडे आदी अधिकारी तपास करीत आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल माळवे विवाहित असून त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या खुनाच्या घटनांनंतर देवळाली गावातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.