संशोधन स्पर्धा प्रशिक्षणाला
२५० प्राध्यापकांचा सहभाग
नाशिक रोड, ता. १ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेची समन्वयक बैठक आणि संशोधन प्रशिक्षण कार्यक्रम नाशिक रोड येथे झाला. राज्यभरातून २५० प्राध्यापक उपस्थित होते. आरोग्यसंपदा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप सेंटरचे संचालक डॉ. नीलेश पुरकर, प्रा. डॉ. संजय खोब्रागडे, मानसोपचारतज्ज्ञ प्रवीण गांगुर्डे, विद्यापीठाचे अधिकारी, विविध संस्थांचे प्राचार्य, संचालक व समन्वयक उपस्थित होते. डॉ. पुरकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती व नवोन्मेषी विचारसरणी रुजविण्याची गरज सांगत आरोग्याच्या प्राथमिक तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धांची मार्गदर्शक तत्त्वे, सहभागाची प्रक्रिया, विभागीय व विद्यापीठ स्तरावरील फेऱ्यांचे नियोजन याबाबत सादरीकरणे झाले. डॉ. संगीता मेटकर, प्रा. तेजस महागावकर, प्रा. अनिकेत जंगम, डॉ. माधुरी भगत, शिवांजली पवार, संतोष बटवले यांच्या समन्वयाने हे प्रशिक्षण झाले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रतिष्ठित संशोधन स्पर्धा असून, तिच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संस्थांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अमित शेष, कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली मेत्ता फाउंडेशनच्या सहकार्याने नाशिकमध्ये प्रथमच हा कार्यक्रम झाला.