CHE26B17555
नाशिक रोड : पोलिसांकडून जेसीबीसह अटक करण्यात आलेली आंतरराज्य टोळी.
भूमिगत केबल चोरीचा डाव उधळला;
आंतरराज्य टोळीतील सात जण जेरबंद
नाशिक रोड पोलिसांची रात्रगस्तीतील कारवाई; केबल उपसण्यासाठी वापरलेला जेसीबीही ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. ४ : रात्रगस्तीवर असलेल्या नाशिक रोड पोलिसांनी भूमिगत केबल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा डाव उधळून सात संशयितांना ताब्यात घेतले. कलंत्री बिल्डिंग परिसरातील डेअरी डॉन आइस्क्रीम दुकानाजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केबल बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारा जेसीबीही पोलिसांनी जप्त केला आहे.
सरकारी मालमत्ता आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील चोरी रोखण्यासाठी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त किशोर काळे आणि नाशिक रोड विभागाच्या सहायक आयुक्त अब्दिता शिंदे यांच्या आदेशानुसार गस्त वाढविण्यात आली होती. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी गुन्हेशोध पथकासह पेट्रोलिंग पथकाला संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
संशयास्पद गर्दीने वाढविला संशय
२ सप्टेंबरच्या रात्री गुन्हेशोध पथक परिसरात गस्त घालत असताना कलंत्री बिल्डींगजवळ काही इसम संशयास्पदरीत्या जमल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळू लागले. मात्र, पथकाने तत्काळ पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेतले.
बशिर कमरुद्दीन शेख यांच्या तक्रारीनुसार, संशयितांनी रस्त्याच्या कडेला असलेले चेंबर उघडून जेसीबीच्या साहाय्याने भूमिगत केबल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. केबल कापून चोरी करण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी चेंबरचे झाकण बाजूला काढून ठेवले होते. याबाबत विचारणा करताच संशयितांनी वाद घालत शेख यांचा मोबाईल हिसकावून घेतला तसेच त्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील बिडकर करीत आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोपाल हरपाल शर्मा, विजय खुपसिंग कुमार (दोघे नवी दिल्ली), चंद्रशेखर सुरेशचंद भट, जसविंदरसिंग सतनामसिंग भाटिया (दोघे गुडगाव, हरियाणा), प्रदीप सुभाष आवारे (कात्रज, पुणे) आणि सत्यनाम हरिनाम लोधी (सामनगाव, नाशिकरोड) यांचा समावेश आहे. अन्य एका संशयितासह एकूण सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, साजिद अली अन्सारी ऊर्फ तैमूर अली खान, दीपक झरे (नेरूळ, मुंबई) यांच्यासह आणखी चार ते पाच संशयित फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
गुन्हेशोध पथकातील हवालदार विशाल पाटील, नितीन भामरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, अंमलदार अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे, गोकूळ कासार, नाना पानसरे, विशाल कुंवर, समाधान वाजे, अजय देशमुख, दीपक दिवटे, विनोद भोर व भाऊसाहेब चत्तर यांच्या पथकाने ही कारवाई केली.