फोटो : B17609
नाशिक रोड: मध्यवर्ती कारागृहात पोळ्यानिमित्त बैलाचे पूजन करताना अधीक्षक अरुणा मुगुटराव आदी
--
कारागृहाच्या भिंतींआड पोळ्याचा उत्साह
नाशिक रोड मध्यवर्ती जेलमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजन
नाशिक रोड, ता.११ : तुरुंगाच्या उंच भिंती आणि लोखंडी गज कैद्यांना त्यांच्या मातीशी, संस्कृतीशी आणि पारंपरिक श्रद्धांशी जोडणाऱ्या नात्यापासून दूर ठेवू शकले नाहीत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महत्त्वाचा कृषी सण असलेल्या पोळ्यानिमित्त नाशिक रोड येथील नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा केला.
बैलांचे पूजन, आरती आणि पुरणपोळीचा नैवेद्य अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांचे हस्ते पुजा करण्यात आली. पोळ्यानिमित्त कारागृह परिसरातील शेती तसेच गोशाळेतील बैल आणि अन्य गुरांना सकाळी स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर कैद्यांनी बैलांना सजविले. बैलांच्या शिंगांना रंग लावून त्यांच्या कपाळावर बाशिंग बांधण्यात आले, तसेच फुलांचे हार घालून त्यांचा साजशृंगार करण्यात आला. सजविलेल्या बैलांची कैद्यांनी सामूहिक आरती केली. कपाळावर टिळा लावून त्यांना नमन करण्यात आले. बैलांना पुरणपोळी आणि चाऱ्याचा पारंपरिक नैवेद्य देण्यात आला. कारागृह प्रशासनाकडून कैद्यांसाठीही पोळ्यानिमित्त विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबांशी संबंधित असलेल्या अनेक कैद्यांसाठी हा सोहळा भावनिक ठरला. तुरुंगात असतानाही आपल्या गावाकडील सण-परंपरांचा अनुभव घेता आल्याने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बैलांची पूजा करताना अनेक कैद्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भावुकता दिसून आली.
कारागृहातील कैद्यांवरील मानसिक ताण कमी करणे, त्यांच्या भावनिक स्वास्थ्याला आधार देणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवणे, या उद्देशाने विविध पारंपरिक सण साजरे केले जातात. अशा उपक्रमांमुळे कैद्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच कुटुंब, गाव आणि संस्कृतीशी असलेली नाळ कायम असल्याची जाणीव त्यांना होते.