फोटो ः 03554
आरावे : येथे नैसर्गिक शेती शाळेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मनोजकुमार सिसोदे, डॉ. अतिश पाटील, दिलीप पाटील आदी.
---
आरावेत विषमुक्त शेतीकडे पाऊल
‘आत्मा’ अंतर्गत नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
चिमठाणे, ता. २३ : केंद्र व राज्य शासनाच्या नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत, शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने नैसर्गिक शेती शाळेचा पहिला वर्ग शुक्रवारी (ता. १९) पार पडला. शेतकरी कैलास गिरासे यांच्या शेतात आयोजित या वर्गात मका पिकावर आधारित नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व सांगून बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत आणि त्यांच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच मका पिकातील लष्करी अळीचे नैसर्गिक नियंत्रण, आच्छादनाचे महत्त्व आणि बीजप्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनी स्वतः जीवामृत तयार करून वापरण्याचा संकल्प केला.
या उपक्रमांतर्गत दर पंधरा दिवसांनी पिकाच्या वाढीच्या टप्प्यांनुसार एकूण सहा वर्ग शेतावरच घेतले जातील. यामुळे उत्पादन खर्चात बचत होईल, जमिनीचा पोत सुधारेल आणि विषमुक्त अन्न उत्पादनामुळे आरोग्य जपण्यास मदत होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला. या वर्गाला तालुका कृषी अधिकारी मनोजकुमार शिसोदे, शास्त्रज्ञ डॉ. अतिश पाटील, कृषिभूषण दिलीप पाटील, मंडळ कृषी अधिकारी देवेंद्र नागरे, आत्माचे संदीप पवार, किरण देसले, कृषी सहाय्यक प्रकाश माळी व परिसरातील ३५ ते ४० शेतकरी उपस्थित होते.
--