अंडरपासच्या मागणीवरून वाद;
नगरसेवकाची मारहाणीची तक्रार
पाणी साचणे, वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून चांदवडमध्ये नवा वाद
सकाळ वृत्तसेवा
गणूर, ता. २४ : चांदवड शहरातील पावसाळी पाणी निचरा, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित असलेल्या प्रस्तावित अंडरपासच्या मागणीवरून शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक सुधीर सुनील कबाडे यांनी सचिन दत्तात्रय राऊत यांच्याविरोधात मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार चांदवड पोलिस ठाण्यात दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
२२ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर हायवे रोडवरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. डोंगर भाग व गणेश कॉलनी परिसरातून आलेले पाणी रेणुका कॉम्प्लेक्स परिसरात घुसल्याने काही दुकानांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि व्यापाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती.
हॉटेल परिसरातील पार्किंगमुळे होणारी गैरसोय, पावसाळ्यातील पाणी साठा आणि वाढती वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून संबंधित ठिकाणी अंडरपास उभारण्याची मागणी होत आहे. नेमीनाथ कॉलेज परिसरातील अंडरपासच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविल्यास वाहतुकीला दिलासा मिळेल तसेच पाणी साचण्याचा प्रश्नही कमी होईल, असा दावा करण्यात येत आहे. या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व नगरपरिषद स्तरावर गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, प्रस्तावित अंडरपासला विरोध होत असल्याचेही समोर आले आहे. २३ जून रोजी या विषयावर चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला. यावेळी सचिन राऊत यांनी शर्टची कॉलर पकडून मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप नगरसेवक कबाडे यांनी तक्रारीत केला आहे.
चौकट
अंडरपासचा प्रश्न पुन्हा चर्चेत
चांदवड शहरातील हायवे परिसरात पावसाळ्यात पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. अलीकडील वादानंतर प्रस्तावित अंडरपासची मागणी पुन्हा जोर धरू लागली असून, प्रशासन व संबंधित यंत्रणा याबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.