मालेगाव-नाशिक एसटी बस बायपासने;
चांदवड भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
गणूर (चांदवड), ता. २ : मालेगाव-नाशिक मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या काही बस निर्धारित बसस्थानकात न थांबता बायपास मार्गाने जात असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकाराची तक्रार कवी विष्णू थोरे यांनी परिवहन आयुक्तांकडे केली आहे.
मालेगाव-नाशिक मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसस्थानकात बसची प्रतीक्षा करावी लागते. मात्र काही बस बायपासने पुढे जात असल्याने प्रवाशांना बससेवेपासून वंचित राहावे लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा विशेष त्रास सहन करावा लागतो. अनेकदा बायपासवर जाऊन बस पकडावी लागत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे थोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
एसटी महामंडळाची बससेवा ही सर्वसामान्यांच्या दळणवळणाचा प्रमुख आधार असताना निर्धारित बसस्थानकात न येता बस बायपासने का जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पुरेसे लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालेगाव-नाशिक मार्गावरील बसफेऱ्यांची तातडीने चौकशी करून बस बायपासने जाण्यामागचे कारण स्पष्ट करावे. सर्व संबंधित एसटी बस निर्धारित बसस्थानकात येऊन प्रवाशांना सेवा देतील, याबाबत संबंधितांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी थोरे यांनी परिवहन आयुक्तांकडे केली आहे.