सौर कृषी पंपाचे पॅनल चोरट्यांच्या निशाण्यावर
रायपूर शिवारात नऊ पॅनल चोरीला; शेतकऱ्यात चिंता
सकाळ वृत्तसेवा
गणूर (चांदवड), ता. ५ : रात्री शेतात पिकांना पाणी देताना सर्पदंश, वन्यप्राण्यांचे हल्ले आणि कडाक्याच्या थंडीपासून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, तसेच वीजबिलाचा खर्च कमी व्हावा, यासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना सुरू केली. मात्र, आता या योजनेअंतर्गत शेतात बसविण्यात आलेल्या सौर पॅनलवरही चोरट्यांची नजर पडली आहे. चांदवड तालुक्यातील रायपूर शिवारात सौर कृषी पंपाचे नऊ पॅनल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी (महाऊर्जा) अंतर्गत सौर कृषी पंप योजनेतून हे पॅनल शेतात बसविण्यात आले होते. रायपूर येथील शेतकरी संदीप सोपान जेऊघाले यांच्या शेतगट क्रमांक १७५/०३ मधील पॅनल २ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते ३ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान चोरीला गेले. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटर, स्टार्टरनंतर सौर पॅनल
शेतातील विहिरींच्या मोटारी, स्टार्टर चोरीला जाण्याच्या घटना यापूर्वी घडत होत्या. आता चोरट्यांनी सौर पॅनलसारख्या मोठ्या वस्तूंकडेही मोर्चा वळवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा वेळी सौर कृषी पंपाचे पॅनल चोरीला गेल्याने संबंधित शेतकऱ्याच्या पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पॅनल चोरीनंतर चोरट्यांचा शोध आणि पोलिसांचा तपास सुरू राहील; मात्र शेतकऱ्याचा हंगाम थांबणार नाही. त्यामुळे सौर पॅनल चोरीच्या घटनांना आळा घालण्याबरोबरच चोरी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज आहे.