दोन दिवसांत स्वच्छता करा, अन्यथा कचरा नगरपरिषदेत
सत्तेत सहभाग, स्वच्छतेवरून ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा!
सकाळ वृत्तसेवा
चांदवड, ता. ७ : शहरातील वाढती अस्वच्छता, अनियमित कचरा संकलन आणि तुंबलेल्या गटारींच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. येत्या दोन दिवसांत स्वच्छतेचे प्रश्न मार्गी न लावल्यास घरोघरी साचलेला कचरा ट्रॅक्टरद्वारे संकलित करून वाजतगाजत नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात आणून टाकण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात घंटागाड्या अनेक दिवसांपासून नियमित येत नसल्याने नागरिकांच्या घरांमध्ये कचरा साचला असून दुर्गंधी पसरल्याचे म्हटले आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढल्याचा दावा पक्षाने केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराची स्वच्छता व्यवस्था तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
नगरपरिषदेकडून घरपट्टी व नळपट्टी थकबाकीवर शास्ती व दंड आकारला जातो. त्याच धर्तीवर चालू वर्षातील घरपट्टीतील स्वच्छता कर माफ करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. आंदोलनाची सुरुवात म्हणून कचऱ्याने भरलेला डस्टबिन स्वच्छता अभियंता सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शहरप्रमुख प्रसाद प्रजापत, शहर संघटक सचिन (गुड्डू) खैरनार, शहर समन्वयक सुरेश सोनवणे, उपशहरप्रमुख शंभूराजे खैरे, धीरज संकलेचा, तोफिक शेख, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अकबर पठाण, वसीम, युवासेना शहरप्रमुख रुपेश बागूल, नामदेवराव विसपुते, रिजवान घासी आदींनी निवेदन दिले.
चौकट
सत्ताधाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा!
चांदवड नगरपरिषदेत भाजपची सत्ता असताना जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थापन करण्यात आलेल्या सत्तेच्या गटात शिवसेना ठाकरे गटाच्या एकमेव नगरसेविका राजश्री प्रजापत यांचा समावेश आहे. त्याच पक्षाचे शहरप्रमुख प्रसाद प्रजापत यांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्याने सत्तेतील सहभाग आणि बाहेरून सत्तेविरोधातील आक्रमक भूमिका याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.