चांदवड शिक्षक पतसंस्थेला ७७ लाखांचा नफा
सभासदांना ८ टक्के लाभांश; २५ लाखांपर्यंत कर्जपुरवठा, १० लाखांचे विमा कवच
सकाळवृत्तसेवा
गणूर (चांदवड), ता. १२ : प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था, चांदवडने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ७७ लाख १३ हजार ४०८ रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती चेअरमन किरण गांगुर्डे यांनी दिली. रविवार (ता. १३) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना आठ टक्के लाभांश देण्यास मंजुरी घेतली जाणार आहे.
नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र प्राप्त झाल्यानंतर संस्थेच्या विस्ताराला गती मिळाली आहे. स्वमालकीच्या इमारतीतून सभासदांना ८.५ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जात असून, कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज न घेता केवळ सभासदांच्या ठेवींवर आधारित व्यवहार केले जात आहेत. सभासदांना २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मृत सभासदांच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची मदत, तसेच १० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे. ऑनलाइन अॅपद्वारे सभासदांना खात्याचे व्यवहार पाहता येतात.
आर्थिक प्रगतीसोबत संस्थेने सामाजिक बांधिलकीही जपली आहे. गुणवंत पाल्यांना पारितोषिके देण्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व शिक्षकांचा ‘कै. देवाजीनाना गांगुर्डे शिक्षक रत्न पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. संस्थेची आर्थिक उलाढाल २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, ऑडिट वर्ग ‘अ’ कायम आहे.
शिक्षकरत्न पुरस्कार
यंदा उपक्रमशील अधिकारी म्हणून मनोहर सूर्यवंशी, श्रीधर देवरे, निलेश पाटील, शितल तावडे, धनंजय कोळी व दिलीप नाईकवाडे यांचा गौरव होणार आहे. तसेच चंद्रकांत सूर्यवंशी, नवल चौरे, शितल कापडणीस, मेघा कुंभारकर, सुरेश पवार, साहेबराव शेवाळे, दिनेश बागूल, दिनेश पवार व निलिमा पगार या नऊ शिक्षकांची ‘शिक्षक रत्न’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.