NSK26H28588
चाळीसगाव ः पालिका कार्यालयावर बुधवारी काढलेल्या मोर्चात सहभागी बंजारा समाजबांधव.
---
पुतळ्यासाठी बंजारा समाज एकवटला
चाळीसगाव पालिकेवर धडक मोर्चा; ठिय्या आंदोलनाची दखल
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. २ ः शहरात संत सेवालाल महाराजांचे स्मारक तथा अश्वारूढ पुतळा उभारावा, या मागणीसाठी तालुक्यातील बंजारा समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने बुधवारी (ता. २) येथील पालिकेवर धडक मोर्चा काढला.
शासकीय विश्रामगृहापासून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे पालिकेत पोहोचला. तेथे समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन करीत संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याची मागणी जोरदारपणे मांडली. आंदोलनात बंजारा समाजातील ज्येष्ठ मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुण सहभागी झाले होते. ‘संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा’, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी पालिका परिसरात बंदोबस्त ठेवला होता.
पालिकेकडून आश्वासन
आंदोलनस्थळी पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनी बंजारा समाजबांधवांशी चर्चा केली. येत्या १५ दिवसांत संत सेवालाल महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, यापूर्वीही अशी आश्वासने मिळाली असून, आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्षात पुतळा उभारला गेला पाहिजे, अशी भूमिका समाजबांधवांनी घेतली. हे शेवटचे आश्वासन आहे. आता पुतळा उभारण्यास विलंब झाल्यास समाजबांधव स्वतःच्या पैशातून संत सेवालाल महाराजांचा पुतळा उभारतील, असा इशाराही देण्यात आला. बंजारा समाजाचे नेते सुधाकर राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.
अनेकांचा पाठिंबा
बंजारा समाजबांधवांच्या आंदोलनाला माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासह (कै.) लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचे नगरसेवक, अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, सायली जाधव, घृष्णेश्वर पाटील आदींनी पाठिंबा दिला. दरम्यान, पालिकेने दिलेल्या १५ दिवसांच्या आश्वासनाची अंमलबजावणी होते की पुन्हा आश्वासनच मिळते, याकडे बंजारा समाजाचे लक्ष लागले आहे.