CSG26B02922
चाळीसगाव ः धुळे रोडवर साकारण्यात आलेले नमो उद्यान.
चाळीसगाव नगरपालिकेच्या
‘नमो उद्यान’चे आज लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. १६ ः शहरातील धुळे रोडवरील प्रभाग एकमधील तेजस कोणार्क परिसरात सुमारे १ कोटी २५ लाखांच्या निधीतून साकारलेल्या नमो उद्यानाचा लोकार्पण सोहळा गुरूवारी (त. १७) आयोजित करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे राबवण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत हे उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे. शहरातील सुवर्णाताई उद्यानाचा कायापालट केल्यानंतर रेल्वे पुलाच्या पलीकडील परिसरातील नागरिकांकडूनही अद्ययावत व सर्व सुविधांनीयुक्त उद्यानाची मागणी होत होती. पालिका निवडणुकीच्या काळात आमदार मंगेश चव्हाण यांनी या परिसरात सुंदर उद्यान उभारण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार एका वर्षाच्या कालावधीत पालिकेच्या माध्यमातून हे उद्यान साकारण्यात आले आहे. जिल्ह्यातील पहिले ‘नमो उद्यान’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या या उद्यानात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उद्यानाच्या कामाची आमदार चव्हाण यांनी नुकतीच पाहणी करुन कामाचा आढावा घेतला होता. यावेळी संजय पाटील, गटनेते प्रशांत कुमावत, नगरसेवक करणसिंग पाटील, नगरसेविका मनीषा पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. गुरूवारी (ता. १७) होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थितीचे आवाहन पालिकेने केले आहे.
--------------------------