(पान ४ ला मेन)
स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; पाच ग्राहकांविरुद्ध गुन्हे
महावितरणची वीजचोरीविरोधी मोहीम तीव्र; ‘रॅकेट’चा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
दोंडाईचा, ता. १ : स्मार्ट मीटरमध्ये अनधिकृत छेडछाड करून वीजचोरी केल्याच्या संशयावरून महावितरणच्या दोंडाईचा विभागाने पाच ग्राहकांविरुद्ध कारवाई केली आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वीही चार ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
महावितरणच्या पथकाने केलेल्या तपासणीत स्मार्ट मीटरमध्ये भौतिक छेडछाड करून वीजवापराची नोंद कमी केल्याचे आढळून आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. त्यानुसार संबंधित ग्राहकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दोन स्वतंत्र प्रकरणांत कारवाई
सहायक अभियंता प्रेमसागर चुनारकर यांच्या फिर्यादीवरून मेथी (ता. शिंदखेडा) येथील एका महिला ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरमध्ये अनधिकृत छेडछाड करून वीजवापराची नोंद कमी केल्याचा आरोप संबंधित ग्राहकावर आहे. दुसऱ्या प्रकरणात सहायक अभियंता सचिन पावरा यांच्या फिर्यादीवरून दोंडाईचा येथील शकील हाजी करीम पिंजारी, खाटीक कामू सुलेमान पिंजारी यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांत स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरीस मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छेडछाडीची पद्धत समान; रॅकेटचा संशय
स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करण्याची पद्धत समान स्वरूपाची आढळून आल्याने या प्रकारामागे एखादी व्यक्ती, टीम अथवा वीजचोरीसाठी कार्यरत रॅकेट आहे का, याचा तपास महावितरणकडून सुरू आहे. ग्राहकांना मीटरमध्ये छेडछाड करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी व अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.
---------
महावितरणच्या ग्राहकांनी स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. तसेच, वीजचोरीच्या प्रकारांना प्रोत्साहन देऊ नये. वीजचोरीची प्रकरणे केवळ दंड अथवा तडजोडीपुरती मर्यादित न ठेवता दोषींविरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कारवाई केली जाईल. तसेच, वीजचोरीस मदत करणाऱ्या व्यक्ती, टीम अथवा रॅकेटचाही शोध घेण्यात येईल.
- भाऊसाहेब पाटील, कार्यकारी अभियंता