गायी निर्दयीपणे घेऊन जाणारे
वाहन पोलिसांनी पकडले
सकाळ वृत्तसेवा
दोंडाईचा, ता. ९ : पिक-अप वाहनातून सात गोवंश जनावरांना निर्दयीपणे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले आहे. वाहनास मदत करणाऱ्या दोन कार व गायी, असा पाच लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पाच संशयितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी (ता. ८) रात्री साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास दोंडाईचा- नंदुरबार चौफुलीकडे कार (जीजे ०३, इएल ९३९०) गोवंश घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीला मदत करीत असताना दिसली. ही दोन्ही वाहन शहाद्याकडे जात होती. उड्डाणपुलाजवळ गणराज कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला स्कूटीवर (एमएच १८, एएल ५६५३) उभे असलेले किशोर ताराचंद बोधिजा (रा. सिंधी कॉलनी) यांना जनावरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपने (एमएच १८, बीजी १४९१) जोरदार धडक दिली व तिथून गाडी पळवून नेली.
बह्याणे (ता. नंदुरबार) शिवारात जनावरांसह संशयित शाहरुख कुरेशी व गोलू कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोबत असलेल्या कारमधील अनोळखी दोन ते तीन व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पडून गेले. पिकअपमध्ये सात गायी कोंबून घेऊन जात होते.
दरम्यान, किशोर बोधिजा यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी (ता. ९) सकाळी त्यांना डॉ. सलमान कुरेशी यांनी मृत घोषित केले. याबाबत केदार अनिल चौधरी यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलिसांत शाहरुख कुरेशी, गोलू कुरेशी (रा. तळोदा, जि. नंदुरबार) व त्यांच्यासोबत असलेले अनोळखी दोन ते तिघांवर जितेंद्र हरेशलाल बोधवाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक इम्रान खान तपास करीत आहेत.