(मेन करणे)
DO126B04318, DO126B04319
दोंडाईचा : पितृ छाया आक्सिजन पार्कमध्ये प्रवेश कमान, पागोडा लोकार्पणप्रसंगी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल. व्यासपीठावर उद्योजक सरकारसाहेब रावल, नगराध्यक्ष नयनकुवरताई रावल, सुभद्रादेवी रावल, डॉ. रवींद्र देशमुख आदी. दुसऱ्या छायाचित्रात ऑक्सिजन पार्क येथे पागोडाच्या लोकार्पणप्रसंगी सुभद्रादेवी रावल, जयकुमार रावल आदी.
---------------
‘ऑक्सिजन पार्क’मध्ये एक लाख वृक्षांचे लक्ष्य
पालकमंत्री जयकुमार रावल : झाडांचे संगोपन करून निसर्गाशी नाते जोडावे
सकाळ वृत्तसेवा
दोंडाईचा, ता. १० : मालपूर रस्त्यावरील मातृपितृ छाया ऑक्सिजन पार्कच्या सात एकर क्षेत्रात एक लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करून निसर्गाशी नाते जोडले पाहिजे. या उपक्रमात शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि विविध क्लब यांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
सहकार महर्षी तथा माजी आमदार दादासाहेब रावल यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी (ता. १०) मातृपितृ छाया ऑक्सिजन पार्क येथे उभारण्यात आलेल्या प्रवेश कमान व पागोडाचे लोकार्पण मंत्री रावल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री रावल म्हणाले, दोन वर्षांपूर्वी ऑक्सिजन पार्कमध्ये १६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. ही झाडे आता डौलाने वाढली आहेत. आगामी काळात जयंती, पुण्यतिथी अथवा वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने वृक्षलागवड करण्याचा संकल्प करावा. शहराच्या विकासासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. दोंडाईचा शहराची ओळख ‘मोरनगरी’ म्हणून कायम राहावी आणि शहर जगातील सुंदर व अत्याधुनिक शहरांमध्ये दिसावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीचा संकल्प केला. उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहळाही झाला. कैलास जैन यांनी प्रास्ताविक केले. दोन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या सहभागातून या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली होती. जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून झोपडी व प्रवेशद्वार उभारण्यात आले असून, आगामी काळात हे ठिकाण शहरासाठी चांगले ‘पिकनिक पॉइंट’ ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. राजेश मुणोत यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी उद्योगपती सरकारसाहेब रावल, माजी मंत्री डॉ. हेमतराव देशमुख, नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल, सभागृह नेते सुभद्रादेवी रावल, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, उपनगराध्यक्ष विजय पाटील, गटनेते निखिल जाधव, हस्ती बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, राजेश मुणोत, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती मुकेश देवरे, नगरसेवक रामभाऊ माणिक, विजय मराठे, प्रवीण महाजन, हितेंद्र महाले, मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, चंद्रकला सिसोदिया, सुरेश जैन, अपर तहसीलदार सुरेश कोळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गौरव शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. चव्हाण, सचिन सोनवणे यांच्यासह नगर परिषद सभापती, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
---------
दोन कूपनलिका करण्यात येणार
जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून सुमारे ५० लाख रुपये खर्च करून प्रवेश कमान, तीन पागोडा आणि रेलिंग उभारण्यात आले आहेत. आगामी काळात नगर परिषदेकडून दोन कूपनलिका करण्यात येणार असून, त्याद्वारे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून झाडांना पाणीपुरवठा केला जाईल. तसेच केटीवेअरच्या निर्मितीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.