DO126B04329
दोंडाईचा : शिंदखेडा तालुका दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन अपर तहसीलदार सुरेश कोळी यांना भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली.
--------
शिंदखेडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा
भारतीय किसान संघाचे तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
दोंडाईचा, ता. १९ : शिंदखेडा तालुक्यात पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. पिके जळू लागली आहेत. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शिंदखेडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अपर तहसीलदार सुरेश कोळी यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा तालुक्यात गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके जळू लागली आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. खरीप हंगामात बी- बियाणे, खते व कीटकनाशकांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनावर परिणाम होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व शासकीय सवलती द्याव्यात. तसेच, नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी किसान संघाचे जिल्हा कोशाध्यक्ष सुरेश पाटोळे, जिल्हा उपाध्यक्ष भोजुसिंग गिरासे, उत्तम तावडे, तालुकाध्यक्ष रणवीर पाटील, ग्राम समितीचे अध्यक्ष बबन सावंत, ईश्वरसिंग रावल, दामोदर माळी, संजय बागूल, रवींद्र चौधरी, चंद्रकांत भावसार आदी पदाधिकारी उपस्थित होते.