HUS26B00563
कुसुंबा : महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती कार्यक्रमात उपस्थित शिक्षक.
-----
झाडे वाचली तरच वसुंधरा वाचेल
डॉ. पाटील : कुसुंबा महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण अभियान
सकाळ वृत्तसेवा
कुसुंबा, ता. १४ : पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. झाडांचे मुलांप्रमाणे संगोपन करून त्यांची काळजी घेतली पाहिजे. झाडे वाचली तर वसुंधरा वाचेल आणि वसुंधरा वाचली तर संपूर्ण जीवसृष्टी टिकून राहील, असे मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पर्यावरण संरक्षण व संवर्धन अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल चौधरी होते. विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. प्रवीण महाले यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. संस्थेच्या सचिव तथा अधिसभा व विद्या परिषद सदस्य प्रा. डॉ. दीपिका चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. जी. कासार, प्राचार्य प्रा. डॉ. एस. जी. बाविस्कर आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. अनिल चौधरी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक असल्याचे सांगून प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. सुनील बावने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. बी. बी. गायकवाड यांनी आभार मानले.