इगतपुरी तालुक्याच्या पावसाचे आगमन
----------------
भात रोपांना मिळाली संजीवनी : पूर्व भाग मात्र प्रतिक्षेतच, पेरणीसह हंगामाच्या कामांसाठी बळीराजाची लगबग सुरू : :
~~~~~~~~~~~~
विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.२२ : पावसाचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरासह तालुक्यात वरुणराजाचे सोमवारी (ता.२२) दुपारच्या सुमारास आगमन झाले आहे. त्यामुळे भाताच्या रोपांनां संजीवनी मिळाली असून काही दिवसांपासून अपेक्षित अशा स्वरूपात आगमन झाल्यामुळे बळीराजाचा चेहरा खुलला आहे.
महिनाभरापासून पावसाने माहेरघरातच सर्वत्र हुलकावणी दिली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्याचां जीव भांडयात पडून नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. इगतपुरी शहर व परिसरासह पाश्चिम पट्टयातील भावलीखुर्द, मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, कारावाडी, अवळखेड, कारावाडी, घोटी, तळोशी, टाकेघोटी, बलायदुरी, त्रिंगलवाडी, बोरटेभें, टिटोली जामुंडे, गव्हांडे, पारदेवी, गिरणारे, तळेगाव, चिंचलेखैरे, खैरेवाडी तसेच इतर भागात पाऊस झाल्याने पश्चिम पट्ट्यात व मध्य भागासह दिलासा मिळाला आहे.
या पावसामुळे भात शेतीला व भाताच्या रोपांना संजीवनी मिळाल्यामुळे शेतकरी बांधावामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान पावसाची अशीच कायम कृपा राहीली तर रोपांची वाढ होण्यास मदत मिळून हंगामातील भात लागवडीला वेग येण्यास मदत होणार आहे. दरम्यान इगतपुरी शहरात व पारिसरात समाधानकारक पाउस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
----------