फोटो : 08310
पान-२ मेन
आंबेवाडी (ता. इगतपुरी) : येथे कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना माहिती देताना तालुका कृषी अधिकारी रामदास मडके.
एल निनोमुळे कमी पावसाची शक्यता
इगतपुरी कृषी विभागातर्फे गावागावांत कार्यशाळा
------------------------------
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता. २३ : हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षी ‘एल निनो’ स्थिती सक्रिय असण्याची शक्यता असल्याने पावसाचे प्रमाण कमी किंवा खंडित राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीत शेतीचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले. तालुक्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ३० हजार ९४७ हेक्टर असून, यामध्ये भात- २६ हजार २१० हेक्टर, वरई एक हजार १६ हेक्टर, नाचणी एक हजार ५१४ हेक्टर, तर सोयाबीन ५०२ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. या हंमागात या पिकांची एल निनोच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे.
गेल्या वर्षी २३ जून २०२५ अखेर २९८ मिलिमीटर पाऊस झाला होता. एल निनोच्या पार्श्वभूमीवर या वर्षी आजपर्यंत फक्त ८.९० मिलिमिटर पाऊस झाला आहे. या वर्षी हवामान विभागानेही सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या निर्देशानुसार अपुऱ्या पावसावर किंवा पहिल्याच मोठ्या पावसावर घाईघाईने पेरणी करू नका. जमिनीमध्ये पेरणीयोग्य पुरेशी ओल निर्माण होत नाही आणि पावसाची खात्री पटत नाही, तोपर्यंत पेरणी करणे टाळावे. तसेच संपूर्ण क्षेत्राची एकाच दिवशी पेरणी टाळावी. टप्प्याटप्प्याने पेरणीचे नियोजन करावे, जेणेकरून पावसाचा खंड पडल्यास संपूर्ण पिकाचे एकाच वेळी होणारे नुकसान टाळता येईल.
पावसाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणीची वेळ आली तर ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी राखीव बियाण्यांचा साठा करून ठेवणे आवश्यक आहे. तालुक्यात भाताच्या बांधावर तूर, मूग, उडीद यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पारंपरिक पिकांना प्राधान्य द्यावे. डोंगराळ भागासाठी नाचणी, वरई यासारख्या पिकांची लागवड उताराला आडवी करावी.
याबरोबरच एकच पीक, एकच पेरणी आणि पावसावर पूर्ण अवलंबित्व ही पद्धत यंदा पूर्णपणे टाळावी. पाणी अडवा, पाणी जिरवा, मिश्र पीक घ्या, जोखीम कमी करा आणि हवामानाशी जुळवून घ्या, या सूत्रांचा अंगीकार करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
-----------------------------.