आशादायक
------------
IGT26B08665
पिंपळगाव घाडगा : येथे सीएसआर महोत्सवातून सिंचनाखाली आणलेल्या शेततळ्यांची पाहणी करताना
महिंद्रा कंपनीचे पथक व ग्रामस्थ.
----------------
पिंपळगाव घाडगा येथे ३० एकर क्षेत्र सिंचनाखाली
‘बायफ’मार्फत ३४ शेतकऱ्यांच्या १७ शेततळ्यांचे ‘सीएसआर’मधून काम पूर्ण
विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.२ : सीएसआर निधीतून केलेली सामुदायिक विहिरींची दुरुस्ती, पाणी बचतीसाठी उभारलेली ठिबक सिंचन सुविधा, आंबा व फळबाग प्रात्यक्षिक आणि भाजीपाल्याची शेती या उपक्रमांचा झालेला यशस्वी प्रयोग इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथे साकार झाला आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या इगतपुरी येथील प्रकल्पाचे प्रमुख भरत भोये आणि कंपनीचे अधिकारी तसेच कर्मचारींनी सीएसआर निधीतून केलेल्या मदतीतून हे शक्य झाले आहे. जलसंधारणासोबत आधुनिक शेतीला चालना देणारी शेततळी, सामुदायिक विहिरींची दुरुस्ती, जलतारा, रिचार्ज शाफ्ट, ठिबक सिंचन सुविधा, आंबा व फळबाग प्रात्यक्षिक आणि भाजीपाला शेती या उपक्रमांचा यात समावेश आहे.
बायफचे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक सुरेश सहाणे आणि सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक प्रशांत बोराडे यांनी प्रकल्पातील कामांची माहिती दिली. सरपंच देविदास देवगिरे, गुलाब जाधव, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनीही प्रकल्पामुळे झालेले बदल, अनुभव आणि उपयुक्तता अधिकाऱ्यांना सांगितली. भरत भोये यांनी कामांची माहिती घेतली. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाची उभारणी स्थानिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे.
-----------------------------
१६-१
असा झाला बदल
गावातील हंगामी स्थलांतर कमी करणे, गावातच शेतीवर आधारित रोजगार उपलब्ध करून देणे,उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करणे आणि दुबार पीक घेणे, हा प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. चालू वर्षात १७ शेततळी बांधण्यात आली असून त्याचा लाभ ३४ शेतकऱ्यांना झाला आहे. या माध्यमातून सुमारे २३८ लाख लिटर पाणीसाठा निर्माण झाला असून ३० एकर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्यामुळे भाजीपाला पिके आणि दुबार पीक घेणेही शक्य झाले आहे. ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच वाटप करण्यात आले आहेत.
------------------