पान-२ अँकर
फोटो : 08672
नांदगाव सदो (ता. इगतपुरी) : कृषी सचिव परिमल सिंह महिला शेतकऱ्यांशी संवाद साधताना.
कृषी सचिव परिमल सिंह यांची नांदगाव सदोला भेट
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचे केले कौतुक
-------------------------
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता. ६ : राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांनी तालुक्यातील नांदगाव सदो येथे भेट देऊन महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी महिला शेतकऱ्यांनी भात पिकात राबविण्यात येणाऱ्या आधुनिक व शाश्वत कृषी तंत्रज्ञानाची माहिती कृषी सचिवांना दिली. महिला शेतकऱ्यांनी भात बियाण्यांची बीजप्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी, हिरवळीच्या खताचा वापर, नियंत्रित लागवड, चिकट सापळ्यांचा वापर याबाबत आपले अनुभव सचिवांसमोर मांडले.
भात पिकातील कीड व्यवस्थापन, उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धती याबाबतही महिलांनी माहिती दिली. कृषी सचिव परिमल सिंह यांनी समाधान व्यक्त केले. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
परिमल सिंह यांनी भात लागवड प्रात्यक्षिकाची पाहणी केली. एल निनोचा तालुक्यात फारसा परिणाम झाला नसल्याचे महिलांनी सांगितले. विभागीय कृषी सह संचालक सुभाष काटकर यांनी सचिव यांना इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक आणि प्रकल्पा विषयी माहिती दिली. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी प्रात्यक्षिक राबवितांना ठेवलेल्या नोंदीचे परिमल सिंह यांनी कौतुक केले.
या वेळी परिमल सिंह यांनी घोटी येथील वूमेन्स पॉवर फार्मर प्रोड्यूसर कंपनीला भेट देत त्यांनी लाकडी घाण्याद्वारे खाद्यतेल निर्मिती युनिटची पाहणी केली. कंपनीच्या सदस्यांशी संवाद साधून तेलनिर्मिती व पूर्ण उद्योगाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष काटकर, नाशिक जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिका रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार, राजेंद्र काळे, सहाय्यक कृषी अधिकारी मोहन तागड, हेमराज देशमुख, स्वप्ना राठोड, समाधान भोये, मनोहर टोपले, हितेंद्र मोरे यांनी प्रयत्न केले. महिला शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब आणि सचिवांसमोर त्यांनी आत्मविश्वासाने मांडलेली माहिती यामुळे नांदगाव सदो येथील हा संवाद विशेष ठरला. येथील महिला शेतकरी ज्योती भागडे, सुजाता भागडे, आशा भागडे, लक्ष्मी भागडे, सविता भागडे, शोभा भागडे, सुनीता भागडे, रूपाली भागडे, लक्ष्मी कडू आदी उपस्थित होत्या.
-------------------------------
सोनांबेतही भेट
सोनांबे ः हरसुले (ता. सिन्नर) येथेही कृषी सचिव परिमल सिंह यांनी शेतशिवाराला भेट देत शेडनेटमधील शिमला मिरची पिकाची पाहणी केली. या वेळी विभागीय कृषी संचालक सुभाष काटकर, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, ‘आत्मा’ प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, विभागीय कृषी अधिकारी बटू पाटील, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, नितीन पगार तसेच कृषी सहाय्यक हर्षल देसले आदी उपस्थित होते. हरसुले गावातील शेतकरी प्रकाश शिंदे, रामचंद्र शिंदे, विलास शिंदे, किरण शिंदे, विष्णू शिंदे, योगेश केदार, मंगेश केदार, योगेश आढाव, सदाशिव शिंदे आदी उपस्थित होते. सिंह यांनी शेतकरी रवींद्र शिंदे यांच्या शेडनेटमधील पिकाची पाहणी करत पिकासाठी आवश्यक वातावरण, लागवड तंत्रज्ञान, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन याबाबत चर्चा केली. येथील परिसरात उत्पादित होणाऱ्या शिमला मिरचीला देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच परदेशी बाजारपेठेतही मोठी संधी निर्माण होऊ शकते, या दृष्टीने निर्यातक्षम उत्पादनावर विशेष भर देण्यात आला. शेतकऱ्यांनी शिमला मिरचीच्या उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील चढ-उतार, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता, तांत्रिक मार्गदर्शन तसेच योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. कृषी सचिवांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष बांधावर जाणून घेत संबंधित कृषी अधिकाऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर कृषी सचिवांनी सुदाम केदार यांच्या टोमॅटो पिकाची व प्रकाश शिंदे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.