मका, सोयाबीन पिके
पावसाच्या ओढीने धोक्यात
कंधाणे : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने आणि कडक उन्हामुळे मका, सोयाबीन पिकांनी माना टाकल्या आहेत. कोरडवाहू पिके करपल्याने विहिरींचे पाणी देऊन पिके वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, शेतीसाठीचा तीन फेज वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शनिवारी झालेल्या तुरळक पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुष्काळाचे सावट कायम आहे. चालू वर्षी उशिराने पावसाला सुरुवात झाली. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करून आंतरमशागतीची कामे उरकली. खतांची मात्रा दिल्याने पिकांची चांगली वाढ झाली. मात्र, ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने मका व सोयाबीन पिके धोक्यात आली. विहिरींची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली; परंतु भारनियमनाच्या वेळेत कमी दाबाने वीजपुरवठा तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. मका व सोयाबीन पीके दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दीर्घ खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने परिसरात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.