जालनाच्या पथकाकडून
खामखेडा गावाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
खामखेडा ता. १४ : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जालना येथील पथकाकडून खामखेडा (ता. देवळा) गावाची तपासणी करण्यात आली. ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्य, आदिवासी नृत्य आणि आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून पथकाचे उत्साहपूर्ण स्वागत केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यभरात १७ सप्टेंबर २०२५ ला सुरुवात झाली. खामखेडा गावाने या अभियानात सहभाग नोंदविला. अभियानात तपासणी पथकाने ग्रामपंचायतीतर्फे राबविलेल्या विविध विकासकामांना भेट देत लोकसहभागातून उभारलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
पथकाने गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अभ्यासिका, पशुवैद्यकीय दवाखाना,तलाठी कार्यालयाची पाहणी केली. घरकूल योजनेत उभारलेल्या घरांना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक कामांना तसेच वृक्ष लागवड व अन्य नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेट देत कामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली.
पथकात जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप पवार, देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी डी. पी. वाघमारे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता जी.रा.जंजाळ, विस्तार अधिकारी व्ही. एम. नागरगोजे, अरविंद उघडे, पी. व्ही. शेरे, गिरीश पै, गणेश मोरे, अंकुश वाघ, सुदर्शन कारवाळ, देवीप्रसाद मांडवडे सहभागी होते.
यावेळी लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार, उपसरपंच सुशिलाबाई शेवाळे, सदस्य श्रावण बोरसे, विमलबाई मोरे, गणेश शेवाळे, रामचंद्र बोरसे, गीताबाई अहिरे, ज्योती सोज्वळ, रेखा पवार, अंबर सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल नांदरे यांच्यासह गावातील अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.