भूमीअभिलेखच्या दोन मोजण्यांत तफावती
जमीनधारकाची फेरतपासणीसह चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
खामखेडा, ता. ९ : पिळकोस शिवारातील गट क्रमांक २९० या जमिनीच्या पूर्वीच्या अधिकृत मोजणी आणि अलीकडे लगतच्या धारकाच्या वारसांच्या विनंतीवरून करण्यात आलेल्या मोजणीमध्ये सुमारे २५ ते ३० फुटांची तफावत आढळल्याचा दावा जमीनधारक कारभारी संपत शेवाळे यांनी केला आहे. या प्रकरणाची फेरतपासणी, निमताना मोजणी आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी भूमी अभिलेख विभागाकडे केली आहे.
शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक २९० मधील ४ हेक्टर ७२ गुंठे क्षेत्राची सुमारे तीन वर्षांपूर्वी भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्यक्ष जागेवर हद्दी निश्चित करून हद्दखुणा व दगड रोवले होते. मोजणीचा नकाशा व संबंधित कागदपत्रेही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, पश्चिम बाजूस लगत असलेल्या महीपत वाघ (मृत) यांच्या वारसांच्या विनंतीवरून अलीकडे झालेल्या मोजणीत पूर्वीच्या मोजणीपेक्षा त्यांच्या जमिनीच्या बाजूने २५ ते ३० फुटांचा फरक दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे दोन मोजण्यांमध्ये एवढी तफावत कशी निर्माण झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पूर्वीच्या व अलीकडील मोजणीचे नकाशे, क-प्रत, मोजणी टिपण, फील्ड बुक, मोजणी बिंदू व कोऑर्डिनेट्स यांची तुलनात्मक तपासणी करावी, तसेच पूर्वीच्या हद्दखुणांची संयुक्त पाहणी करून पंचनामा करावा. तसेच तफावतीचे कारण स्पष्ट करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.