ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी उपोषण
-------------------------------
महालपाटणे ग्रामसेवक सरंपचावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
देवळा, ता.१४ : महालपाटणे (ता.देवळा) येथील ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी माजी उपसरपंच योगेश आहिरे, रविंद्र ठाकरे, अरूण आहिरे यांनी गुरुवार (ता.१४) पासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराबाबत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात आलेला असूनही कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच यांच्यावर गटविकास अधिकारी यांच्याकडून कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही. असा आंदोलकांचा आरोप आहे.
महालपाटणे येथील ग्रामपंचायतीच्या गैर कारभाराबाबत यापूर्वीच चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करण्यात आला आहे. यात १५ वा वित्त अयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा व इतर योजनेत एकूण १७ लाख ३८ हजार ९७४ रुपये इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केलेले आहे.
गैरव्यवहारास जबाबदार कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी अमोल खैरनार व तत्कालीन सरपंच सुरेखा ठाकरे यांच्याविरुद्ध गटविकास अधिकारी यांनी एक महिन्यात चौकशी पूर्ण करणे अनिवार्य असताना सात महिन्याचा कालावधी उलटूनही केवळ नोटीस देणे, खुलासा मागवणे अशा वेळकाढू गोष्टी करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब बेकायदेशीर असून याबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घेत संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी उपसरपंच योगेश आहिरे, रविंद्र ठाकरे, अरूण आहिरे यांची असून त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. निवेदनाच्या प्रति गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आमदार डॉ.राहुल आहेर यांना दिल्या आहेत.
देवळा : आमरण उपोषणास बसलेले योगेश आहिरे व इतर.