08264
शेरी (ता.देवळा) : येथे टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा.
देवळा तालुक्यात पाणीटंचाई
प्रशासनाकडून पाच गावांत टँकर सुरू
सकाळ वृत्तसेवा
देवळा, ता. १५ : तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरु झाल्याने प्रशासनाकडून टँकर सुरु करण्यात आले आहे. तर तालुक्यातील डोंगरगाव व इतर काही गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला होता. तरी देखील एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे. शेरी येथे गेल्यावर्षी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला होता. मात्र या पाझर तलावाला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने तो सध्या कोरडाठाक पडला आहे. परिणामी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. तशीच परिस्थिती गिरणारे, कुंभार्डे, सांगवी या गावांची झाल्याने प्रत्येकी एक टँकर व रोज दोन खेपा याप्रमाणे या गावांची तहान भागवली जात आहे. परसुल धरणातील विहिरीवरून हा पुरवठा केला जात आहे. भिलवाड या गावासाठी वाखारी ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीवरून टँकर भरून पाठवला जात आहे. डोंगर उतारावरील व पूर्वेकडील गावांजवळ असलेले छोटे मोठे पाझर तलावही कोरडे पडले असून पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींना तळ गाठला आहे. यामुळे या भागात बहुतांश गावांत टँकरची मागणी वाढणार आहे. खर्डे परिसराला लाभदायक ठरणारे वार्शी धरणाने देखील तळ गाठला आहे.