महामार्गावर काळाचा घाला;
दुचाकीवरील दांपत्य ठार
देवळा येथे मालवाहू गाडीची धडक
सकाळ वृत्तसेवा
देवळा, ता. २२ : येथील विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर आशादीप मंगल कार्यालयासमोर सोमवारी (ता. २२) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. मालवाहू गाडी व दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत हा प्रकार घडला.
मृतांमध्ये बाबूलाल रमेश गरुड (वय ४६) व वैशाली बाबूलाल गरुड (४२, रा. सटाणा, ह. मु. नाशिक) यांचा समावेश आहे.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रामेश्वर फाट्यानजीक आशादीप मंगल कार्यालयासमोर दुचाकी (एमएच ४१ बीसी ६०६३) आणि मालवाहू गाडी (एमएच १८ बीझेड २७३५) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार बाबूलाल गरुड यांचा अतिरक्तस्रावामुळे, तर वैशाली गरुड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील, पोलिस शिपाई दिलीप सोनवणे व श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
08368
देवळा : येथील विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त मोटारसायकल.