ग्रामस्थांच्या विरोधानंतर लोहोणेरचा वाळू लिलाव रद्द
लिलावधारकाची ६७ लाख ६८ हजारांची रक्कम परत करण्याचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
देवळा, ता. २ : लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रातील वाळू उपशाला ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र विरोधाची दखल घेत महसूल विभागाने वाळू लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लिलावधारकाला संबंधित नदीपात्रातील गटांचा ताबा देता न आल्याने शासनाकडे जमा केलेली ६७ लाख ६८ हजार ७८० रुपयांची संपूर्ण रक्कम परत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
महसूल विभागाने २०२५-२६ साठी लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रातील गट क्रमांक ९५५, ९५६, ९५७, ९५८, ९७१, ९७२ व ९७३ मधील वाळू उपशाचा ठेका सुनंदाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सतर्फे दीपक पाटील यांना ६७ लाख ६८ हजार ७८० रुपयांच्या सर्वोच्च बोलीने मंजूर केला होता. जिल्हाधिकारी, नाशिक यांनी १८ मार्च २०२६ रोजी याबाबत आदेश काढला होता.
मात्र, लोहोणेरसह विठेवाडी, भऊर व खामखेडा या नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी वाळू उपशाला विरोध केला. संबंधित ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन लिलाव रद्द करण्याची मागणी केली होती. वाळू उपशामुळे नदीपात्रातील पाण्याचे स्रोत, गावांच्या पाणीपुरवठा योजना तसेच शेतीच्या सिंचनावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.
लिलाव रद्द
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जून २०२६ ला झालेल्या जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीच्या बैठकीत ग्रामस्थांच्या विरोधामुळे संबंधित गटांचा ताबा देणे शक्य झाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचा ७ जुलै २०२६ चा अहवाल, समितीचा निर्णय आणि वाळू/रेती निर्गती धोरण-२०२५ मधील तरतुदी विचारात घेऊन लोहोणेर वाळू गटाचा लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लिलावधारकाने शासनाकडे जमा केलेली ६७ लाख ६८ हजार ७८० रुपयांची रक्कम परत करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. वाळू उपशाला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.