वीजचोरी तपासणीसाठी गेलेल्या
महावितरण कर्मचाऱ्यांना धमकी
सकाळ वृत्तसेवा
देवळा, ता. ४ : वीजचोरीची तपासणी करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार धोबीघाट (मेशी) येथे शुक्रवारी (ता. ४) दुपारी घडला. याप्रकरणी सहाय्यक अभियंता मनोज महाजन यांच्या तक्रारीवरून देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे सहाय्यक अभियंता सुधाकर महाजन हे कर्मचाऱ्यांसह धोबीघाट येथे प्रेमनाथ देवरे यांच्या नावावरील वीजजोडणीची तपासणी करीत होते. त्यावेळी गणेश देवरे यांनी तपासणीस विरोध केला. वीजचोरीचा स्थळ तपासणी अहवाल तसेच इतर शासकीय कागदपत्रे त्यांनी हिसकावून घेत फाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून काठीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. महिला विद्युत सहाय्यक पल्लवी कांदळकर, सहाय्यक अभियंता किशोर गिरासे, फोरमन गौतम आहिरे व बापू गांगुर्डे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. कर्तव्य बजावत असताना अडथळा आणून शासकीय कागदपत्रे फाडणे, शिवीगाळ करणे व गंभीर धमक्या दिल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.