वनपट्टाधारकांसाठी विशेष मोहीम
आदिवासींना अधिकारपत्र, प्रॉपर्टी कार्ड व सातबारा
सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता. १९ : पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनीचा पट्टा न मिळालेल्या अथवा अपूर्ण दावा असलेल्या आदिवासी बांधवांसाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आमदार नितीन पवार यांच्या पाठपुराव्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या मोहिमेत वनहक्काचे प्रलंबित दावे निकाली काढले जाणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना अधिकारपत्र, नवीन प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा उतारा देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून वनजमिनीच्या हक्काच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
मोहिमेत कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. प्रलंबित प्रस्तावांतील त्रुटी दूर केल्या जातील. पात्र दाव्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ३० सप्टेंबर तसेच १ आणि २ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या ग्रामसभांमध्ये वनहक्क दाव्यांवर चर्चा केली जाईल. पात्र प्रस्तावांना मान्यता देण्याची प्रक्रिया होणार आहे.
कोट
“आदिवासी बांधवांना वनजमिनीवरील त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणताही पात्र लाभार्थी हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल.”
— नितीन पवार, आमदार, कळवण-सुरगाणा
चौकट
मोहिमेतील प्रमुख बाबी
प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढणार
पात्र लाभार्थ्यांना अधिकारपत्र
नवीन प्रॉपर्टी कार्ड व सातबारा उतारा
३० सप्टेंबर, १ व २ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा