पान- २ मेन
गणपतीची फोटो घ्यावा...
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नगरपंचायतीतर्फे स्पर्धा
कळवण ः उत्कृष्ट मंडळांना २१ हजारांचे पारितोषिक
कळवण, ता. १६ ः शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याच्या उद्देशाने कळवण नगरपंचायतीतर्फे यंदा ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची महिती नगराध्यक्ष कौतिक पगार, उपनगराध्यक्ष चेतन मैंद यांनी दिली.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मंडळाला २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला सात हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेच्या परीक्षणात शाडूच्या गणेशमूर्तीचा वापर, नैसर्गिक किंवा इको-फ्रेंडली रंग, कागदी व कापडी सजावट, नैसर्गिक फुले, थर्माकोल व प्लास्टिकमुक्त सजावट आदी बाबींना महत्त्व दिले जाणार आहे. मूर्तीची उंची सहा फुटांच्या आत असावी, असेही नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.
गणेशमूर्तीचे विसर्जन घरातील किंवा मंडळाच्या कुंडात, नगरपंचायतीच्या कृत्रिम विसर्जन कुंडात अथवा मूर्तीदान उपक्रमांतर्गत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. मंडळांनी राबविलेल्या रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त शहर, स्वच्छता शपथ आणि स्वच्छ वॉर्ड यांसारख्या सामाजिक उपक्रमांचे छायाचित्रही सादर करावे लागणार आहे.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणाचे रक्षण करणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन कळवण नगरपंचायतीचे मुखाधिकारी ज्ञानेश येवले यानी केले.