फोटो ः 12806
पुणे : कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना निवेदन देताना ॲड. प्रकाश पाटील व दिलीप पाटील.
--
कर्ब वाढीसाठी खत
बियाण्यास अनुदान द्या
--
ॲड. पाटील यांचे कृषी आयुक्तांना निवेदन
कापडणे, ता. २३ : राज्यातील शेतजमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत खालावल्यामुळे जमिनीची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर घटत आहे. हा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शासनाने हिरवळीच्या पिकांच्या बियाण्यांवर शंभर टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी ॲड. प्रकाश पाटील यांनी कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे येथे कृषी आयुक्त मांढरे यांची भेट घेऊन ॲड. पाटील व दिलीप पाटील यांनी हे निवेदन दिले. निवेदनात जमिनीच्या खालावत्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या कमालीची घटली आहे. जिवाणू नसल्याने पिकांना सेंद्रिय आणि रासायनिक खते शोषून घेणे अशक्य होते. परिणामी, शेतकऱ्यांचा खतांवरील खर्च वाढतो आहे, जमीन कडक होऊन पाण्याचा निचरा कमी होत आहे आणि सामू बिघडून उत्पादकता घटत आहे. दर्जेदार बियाणे व भरपूर खते वापरूनही उत्पादन घटत असल्याने शेती आता परवडेनाशी झाली आहे.
यावर उपाय म्हणून सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ताग, धैंचा यांसारखी हिरवळीची पिके घेऊन ती जमिनीत गाडणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, बियाण्यांचा वाढता खर्च आणि एक हंगाम वाया जात असल्याने शेतकरी हा प्रयोग करण्यास टाळाटाळ करतात. शासनाने जर या बियाण्यांवर अनुदान दिले, तर राज्यातील बहुतांश शेतकरी हा पर्याय आनंदाने स्वीकारतील. यामुळे जमिनीची प्रत सुधारून उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
--