(पान ३ ला मेन)
KPD26B13291
कापडणे : गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करतांना अरूण पाटील, बंटी पाटील, महेश पाटील, रूपक वाणी, धर्मेंद्र पाटील आदी.
-------
कापसाचा यंदा बंपर श्रीगणेशा!
कापडणेत गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर काटापूजन; खुल्या बाजारात कापसाला ८१०० रुपयांचा दर
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ४ : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम आशादायी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत. कापसाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापडणे येथे गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर पूर्वहंगामी कापसाच्या खरेदीला दणक्यात सुरुवात झाली. खरेदीच्या पहिल्याच दिवशी कापसाला प्रति क्विंटल आठ हजार १०० रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुरुवातीचा दर तब्बल ६०० ते ७०० रुपयांनी अधिक आहे.
---------
येथील नामांकित हर हर महादेव ट्रेडिंगच्या वतीने गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर काटापूजन करून कापूस खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी खुल्या बाजारातील उच्चांकी दर म्हणून कापसाला प्रतिक्विंटल आठ हजार १०० रुपये भाव देण्यात आला. मागील वर्षी याच कालावधीत खुल्या बाजारात कापसाला सुमारे ७४०० रुपये दर मिळत होता. त्या तुलनेत यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच सुमारे ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदा शासनाने लांब धाग्याच्या कापसासाठी ८६६७ रुपये, तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी आठ हजार ६१० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारातील दर हमीभावाच्या जवळपास पोहोचल्याने आगामी काळात कापसाच्या दरात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कापडणे परिसरात कापूस खरेदीला झालेला हा उत्साहवर्धक श्रीगणेशा उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम चांगला जाण्याचे संकेत देणारा ठरत आहे.
काटापूजनप्रसंगी व्यापारी अरुण पाटील, महेश पाटील, बंटी पाटील, रुपक वाणी, विलास धर्मेंद्र पाटील, विनोद पाटील, पुरोहित कालिदास जोशी आदी उपस्थित होते.
-------
यंदा पावसाने साथ दिलेली नाही. अद्याप केवळ दोनच मोठे पाऊस झाले आहेत. मात्र, बागायती तसेच पूर्व हंगामी कापसाच्या वेचणीस प्रारंभ झाला आहे. सुरुवातीलाच आठ हजार १०० रूपयांचा दर दिला आहे. पुढे नऊ हजारापर्यंत दर जाईल, अशी आशा आहे. नेहमीच शेतकऱ्यांना बाजारातील सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न केला असून, यंदाही ती परंपरा कायम राखली आहे.
- अरूण पाटील, संचालक, हर हर महादेव कापूस ट्रेडिंग कंपनी